Saturday, January 11, 2025

Lead College Workshop

 "पैसे मिळविण्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणुकीचे ज्ञान आवश्यक"

श्री किशोर जाधव (शेअर ब्रोकर)
आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. गुंतवणुकीचे भरपूर पर्याय उपलब्ध असताना, शेअर बाजारात गुंतवणुकीइतके फायद्याचे काहीही नाही. स्टॉकमध्ये विवेकपूर्ण गुंतवणूक करून तुम्ही प्रचंड नफा मिळवू शकता. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. मात्र पैसे मिळवण्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणुकीचे ज्ञान आवश्यक आहे असे उदगार मा किशोर जाधव (शेअर ब्रोकर)यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्ट्स , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे या महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'शेअर मार्केट गुंतवणूक धोरण ' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड हे होते.
श्री किशोर जाधव आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले, शेअर बाजार हा शेअर्सची हालचाल समजून घेण्यासाठी आणि आकर्षक परतावा मिळविण्यासाठी योग्य ज्ञान असलेल्यांसाठी पैसे कमवण्याचे एक व्यासपीठ आहे. तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज आणि त्यात गुंतवणूक कशी करायची हे जाणून घ्यावे. शेअर गुंतवणुकीद्वारे नफा मिळविण्यासाठी संयम महत्त्वाचा आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले, तुम्ही जेंव्हा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करता तेव्हा तुमच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट दृष्टिकोन बाळगा. तुम्हाला बाजाराचे ज्ञान असेल, स्टॉक निवडताना सावधगिरी बाळगली असेल तरच संभाव्य जास्त नफा मिळविणे शक्य आहे.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत कॉमर्स विभागप्रमुख डॉ. संदीप लोखंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजाराम कांबळे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.रघुनाथ संकपाळ यांनी केले तर आभार अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा संतोष निलाखे यांनी मानले. या कार्यक्रमात श्री राहुल लोंढे व श्री त्र्यंबक कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.